राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची चाहूल देणारे पंचायती निकाल !

राज्यभरातील नगरपरिषदा आणि पंचायत समितीचे सगळे निकाल हाती आले, यातून राज्याची विद्यमान राजकीय स्थिती समोर येतेय. ठळकपणे दिसणारे चित्र असे आहे की या रणधुमाळीत राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यात आपलं अस्तित्व निर्माण केलंय. ही निवडणूक जवळपास सगळ्या राज्यभरात झाली असली असल्याने जयपरजायचे चित्र हे पक्षनिहाय दिसणे शक्य आहे. कारण राज्यातील ३२ जिल्ह्यांत ही निवडणूक झाली. अर्थात स्थानिक पातळीवर निकष वेगळे असू शकतात, पण म्हणून निवडणुकीचे परिणाम दुर्लक्षित करण्यासारखे आहेत असे नाही. भारतीय जनता पार्टीने सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आपले स्थान कायम ठेवले ही अभिनंदनीय बाब आहे. राज्याच्या सर्वच भागात या पक्षाने केलेली कामगिरी लक्षणीय. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या काहीवर्षात भाजपने जुनी काँग्रेस निती अवलंबायला केलेली सुरुवात.
पूर्वी काँग्रेस निवडणूक काळात जे करत असे काहीशी तशीच स्ट्रॅटेजी आता भाजपाची दिसत आहे. जे भाजपने राज्य राज्यात केले तेच स्थानिक पातळीवरही केले. जिथे आपली पकड नाही, आपण सक्षम नाही तिथे त्यांनी पक्षाबाहेरील रसद मागवली आणि विजय संपादित केले. शेवटी स्थानिक पातळीवर तर पक्षीय धोरण, विचारसरणी याचा अभावानेच कस लागतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आकडा, किती जागा निवडून आल्या याला सर्वाधिक महत्त्व आहे. इलेक्टॉरिअल मेरिट हा राजकारणातील सर्वोत्तम गुण आहे हे मान्यच करावे लागेल. भाजपने आपली ताकद अजून आहे हे प्रकर्षाने जाणवून दिले. गेल्या काही वर्षात अन्य पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये आल्याने राज्यात सर्वत्र भाजपाचे अस्तित्त्व जाणवते, मग ते मोहिते, राणे, विखे अशी कोणतीही नेते मंडळी असतील. भाजपचे ४२० इतके उमेदवार विजयी झाले. दोन नंबरवर ३७० जागा घेऊन राष्ट्रवादी, तर काँग्रेस हा राज्यातील क्रमांक तीनच पक्ष राहिला, काँग्रेसने ३५५ जागा मिळवल्या आणि मुख्यमंत्रीपद ताब्यात असणाऱ्या शिवसेनेनं २९८ मिळवल्या.

प्रामुख्याने समोर आलं ते हे की राज्यात काँग्रेसची व्होट बँक अजूनही आहे. पक्ष तळागाळापर्यंत आहे, दुसरे भाजपचा दबदबा या ना त्या कारणाने शाबीत आहेत, तिसरे राष्ट्रवादीने सत्तेच्या वारूवर आपली मांड पक्की जमवलीय आणि या माध्यमातून त्यांनी पुन्हा आपले अस्तित्व बळकट केले. शिवसेनेला सत्तेतून मात्र कोणताही म्हणावा असा लाभ मिळाला नाही. या पक्षाने कधी पंचायती निवडणुकांकडे गांभीर्याने बघितले नाही हे एक कारण असले तरी यंदा त्यांनी एक संधी दवडली असे वाटते. महाआघाडीतील पक्ष स्वतंत्र लढले असले तरी अनेक ठिकाणी सगळ्यांनीच ‘सांभाळून’ घेतले हे निकालांनी स्पष्ट केले आहे. या निवडणुकीतील इतर ही संख्या मोठी आहे सर्वपक्षीय आले जे अपक्ष म्हणून लढले ही संख्या सेनेच्या विजयी वीरांपेक्षा जास्त आहे. सेनेने सत्तेच्या खेळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दोन वर्षांपूर्वी जे बळ दिले त्याचे परिणाम या निवडणुकीत जाणवले. एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रापुरता प्रभावी मानला जाणारा राष्ट्रवादी मराठवाडा आणि विदर्भतीही ठळक अस्तित्त्व दाखवतो आणि याचा फटका भाजप आणि सेनेला बसतो हे वास्तव आहे. कारण मराठवाड्यात सेनेला चिंतीत करणारी बाब आहे तर विदर्भात भाजपाला.
विदर्भात काँग्रेसने आपली ताकद आहे हे एकाअर्थी सिद्ध केले असले तरी प्रदेशाध्यक्ष नानांच्या भंडाऱ्यात त्यांना ५२ पैकी केवळ २१ जागा जिंकता आल्या, राष्ट्रवादी संपवण्याच्या वलग्ना करताना आज आलप्या जिल्ह्यात या पक्षाला सोबत घनु सत्ता मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण राष्ट्रवादीने तिथे १३ जागा मिळवल्या आहेत. दुसरीकडे प्रफुल पटेल यांच्या गोंदियात भाजपने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला ८ तर भाजपाला २६ जागा तिथे मिळाल्या. विदर्भ हा काँग्रेसचा कधी काळी गाद असला तरी अजूनही अनेक बुरुज शाबीत आहेत कारण २९नगरपंचायतीमध्ये या पक्षाला १७२ तर भाजपाला ११६ जागा आणि राष्ट्रवादी ६५-६७ आणि सेना ५० ला अडकली. मराठवाड्यात भाजप आणि राष्ट्रवादीने जवळपास समान जागा जिंकल्या. हा प्रदेश भाजपाला अनुकूल होता पण राष्ट्रवादीची मुसंडी नजरेत भरणारी. सेना आणि काँग्रेस ८० च्या जवळ आहेत. उत्तर महाराष्ट्रात मात्र शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीला मागे टाकत सेनेने इथे ताकद दाखवली. पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित चित्र होतं तर कोकणात सेनेतील सुंदोपसुंदी ने फटका दिलाच. परब – कदम वादात कदमांच्या स्वतंत्र पॅनल्सनि बाजी मारली, राष्ट्रवादीचे बळ या भागात वाढले आणि राणे नियंत्रित राहिले.

महाविकास आघाडी म्हणून तिघांची बेरीज केली तर यश मोठे वाटते , भाजपचे मोठा पक्ष असणे तिथे महत्त्वाचे ठरत नाही. आगामी विधानसभा निवडणुकात ही आघाडी कायम राहिली तर भाजपाला ती निवडणूक जिंकणे सोपे नक्कीच नसेल. आगामी राजकारणाची दिशा सांगणारे हे निकाल आहेत असे आजघडीला तरी म्हणता येईल. पण महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे स्थान ! राज्यात हा पक्ष चौथ्या स्थानावर राहतो ही पक्ष नेतृत्त्वाला काहीशी चिंतीत करणारी बाब आहे. आगामी काळात राष्ट्रवादीची ताकद अशी वाढत राहिली आणि निवडणुकीत चित्र बदलले तर त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणे अवघड नाही. कारण सत्तेत राहूनही दोनदा मुख्यमंत्री पदाने या पक्षाला हूल दिली आहे, या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदाची चाहूल म्हणून बघत असेल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *