श्वान भुंकत असल्याने ; निवृत्त कृषी अधिकाऱ्याने श्वानावर बंदुकीने गोळी झाडली

बिअर बार व हॉटेलमधील पाळीव श्वान सतत भुंकत असल्याने एका निवृत्त कृषी अधिकाऱ्याने बंदुकीने गोळी झाडून त्याची निर्दयीपणे हत्या केली. १० नोव्हेंबरला रात्री धर्मापुरी रोडवरील धारावती तांडा येथे ही घटना घडली.

रामराज कारभारी घोळवे (रा. धर्मापुरी, धारावती तांडा, ता. परळी) असे आरोपीचे नाव आहे. विकास हरिभाऊ बनसोडे यांनी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, धर्मापुरी रोडवरील धारावती तांडा शिवारात त्यांचे बिअर बार व हॉटेल आहे. त्यांनी हॉटेलवर तीन श्वान पाळलेले आहेत. शेजारीच रामराज घोळवे याचे शेत आहे. ते निवृत्त कृषी अधिकारी आहेत. हे श्वान सारखे भुंकत असल्याने ते वैतागले होते.

हेही वाचा :- राज्य सरकारचा मोठा निर्णय, शहरातील हडको-सिडकोत देखील मोठ्या इमारत उभारणे शक्य

१० रोजीही रात्री हॉटेलमधील श्वान जोरजोराने भुंकत होते. हा त्रास असह्य झाल्याने बारा बोअरच्या बंदुकीसह हॉटेलच्या परिसरात येऊन रामराज घोळवे यांनी श्वानावर गोळी झाडली.

११ रोजी सकाळी विकास बनसोडे यांच्या फिर्यादीनुसार, प्राणी संरक्षण कायदा व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक निरीक्षक मारुती मुंडे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *