राज्यपाल म्हणतात ‘अशी’ निवडणूक घटनाबाह्य विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीत खो !

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचा असतानाच राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला मोठा धक्का दिला. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलून आवाजी मतदानाने निवड होणार आहे, ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला कळवलं आहे. त्यामुळे आता पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे दिसत आहेत.

विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्रं पाठवून उत्तर दिलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी पत्रात केला आहे. रविवारी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यात आली असून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली होती. त्यावर राज्यपालांनी उद्यापर्यंत सांगतो असं उत्तर दिलं होतं. राज्यपालांनी आज आपला अभिप्राय कळवला असून थेट निवड प्रक्रियेवरच बोट ठेवलं आहे.

पूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक होत होती. मात्र, सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलला होता. आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याने तो घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे.यावर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने आता पुन्हा राज्यपालांना पात्र पाठविण्यात येईल असे महाआघाडीने म्हटले आहे. आवाजी मतदानानेच ही निवडणूक होईल. नियम बदलण्याचा अधिकार विधिमंडळाला आहे. त्यामुळे काही अडचण नाहीये, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. आम्हीच नाही तर इतर राज्यांनीही असे नियम बदलले आहेत. लोकसभेतही हीच पद्धती आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *