बीड भाजप शहराध्यक्षांची गोळी झाडून आत्महत्या

भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी या संदर्भाने तपास सुरू केला आहे.

भगीरथ बियाणी हे अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. बीड शहरातील एमआयडीसी भागात बियाणी यांचे घर आहे. सोमवारी ते मुंबईला निघाले होते. मात्र मळमळ, उलटीचा त्रास होत असल्याने ते पुन्हा घरी परतले.

नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयासोबत गप्पा मारल्या. त्यानंतर ते झोपण्यासाठी खोलीमध्ये गेले. दरम्यान, मंगळवारी सकाळी उठल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना चहा, आणून दिला. त्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. बराच वेळ झाल्याने दरवाजा उघडत नसल्यामुळे कुटुंबीय त्यांच्या खोलीत गेले असता भगीरथ हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसून आले.

त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यानंतर घटनेची माहिती समजताच अनेक नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. भगीरथ यांनी किती वाजता आत्महत्या केली, याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे.

कुटुंबीयांना धक्का
बियाणी यांच्या घरी एक लग्न आयोजित करण्यात आले होते, त्याची तयारी सुरु होती. सर्व काही सुरळीत असताना भगीरथ यांनी आत्महत्या केली. या घटनेने बियाणी कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कशामुळे भगीरथ यांनी टोकाचे पाऊल उचलले, याबद्दल कुटुंबीय अनभिज्ञ आहे.

रुग्णालयाकडे धाव
भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येची माहिती समजताच खा. डॉ. प्रीतम मुंडे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन हॉल बाहेर दुपारी ४ वाजेपर्यंत गर्दी असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *