अतिशय गंभीर गोष्ट नक्कीच आहे ! पंतप्रधान देशाची अतिमहत्त्वाची व्यक्ती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काल घडलेला प्रकार चिंताजनक आहे. इथे सुरक्षेतील त्रुटी किंवा शेतकरी आंदोलन यामुळे हे घडले असे इथे अजिबात म्हणणे नाही. उद्या गृहमंत्रालयाकडे अहवाल येईल. खरे किंवा खोटे समोर येईल. जे काही होणार असेल ते होईलही, पण भारताच्या पंतप्रधानांच्या ताफ्याने काही मिनिटे पुलावर अडकणे हे जास्त गंभीर आहे. २४ तास सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या एसपीजीची या प्रसंगी नेमकी काय हलगर्जी झाली आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या एनएसजी कमांडो, स्थानिक पोलीस, निमलष्करी दल आणि केंद्रीय आणि राज्य गुप्तचर संस्थांच्या समन्वयाचा काही गडबड झाली की केली गेली हे समोर येणे गरजेचे आहे.
आता सुरु असलेले आरोप प्रत्यारोप तर कालच्या घटनेपेक्षाही भयंकर आहेत. भारताच्या राजकारणाची दिशा म्हणण्यापेक्षा दशा दाखवणारे आज घडतेय. राजकीय पक्ष कोणत्या थराला जात आहेत आणि कालच्या प्रसंगाचे आपापल्या परिने कसे भांडवल करत आहेत हे बघून वाईट वाटलं पाहिजे. यामध्ये भाजप विरोधकांचा आणि भाजपचा अँगल अर्थातच वेगवेगळा आहे.. विशेष म्हणजे मोदी यांनी भटिंडा विमानतळावर केलेले वक्तव्याची शहानिशा होणे महत्त्वाचे. खरंच मोदी यांच्या जीवाला धोका होता का आणि तसे असेल तर सुरक्षा यंत्रणा काय करत होती? आणि पंतप्रधानांना हा धोका कुणाकडून होता हे देखील समोर येणे गरजेचे आहे.
पंजाब सरकारने आणि मुख्यमंत्री चन्नी यांनी व्यक्तिश: लक्ष घालून मोदींच्या सभेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती असे म्हटले आहे तर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्यामुळे त्यांना शारीरिक इजा पोहोचण्याचा धोका निर्माण केल्याचा थेट आरोप केंद्रीयमंत्री व भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला.दोन्ही बाजू जाणून घ्यायला एवढे दोन वक्तव्य पुरेसे नसतीलही पण यातून त्यांचा रोख नक्कीच कळू शकतो.
दुसरीकडे ‘‘मोदींच्या सभेसाठी ७० हजार खुर्च्या मांडल्या होत्या पण, तिथे जेमतेम ७०० लोक आले होते’’, अशी खोचक टिप्पणी चन्नी यांनी केली. हे स्पष्ट आहे की जे झाले (किंवा केले गेले) त्याचे भांडवल पंजाब निवडणुकीचा एक प्रभावी मुद्दा ठरू याचा अंदाज भाजपा आणि काँग्रेसलाही आला आहे. जाहीरसभेसाठी १० हजार पोलीस तैनात करून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिले.
पाऊस पडत असल्याने व खराब हवामानामुळे मोदी विमानतळावर २० मिनिटे थांबले होते. पण, उड्डाण रिस्की ठरेल असे वाटल्याने स्मारकाकडे बाय रोड जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदींचा ताफा रस्त्याच्या मार्गाने दोन तास प्रवास करणार असल्याची माहिती पंजाबच्या पोलीस महासंचालकांना कळवण्यात आली. संपूर्ण नियोजित मार्गावर आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आल्याची पोलीस महासंचालकांकडून खात्री करून घेतल्यानंतर मोदींचा ताफा विमानळावरून रवाना झाला, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वास्तविक पंतप्रधान जिथे जातात तिथे प्रत्येक स्टेजला एसपीजी तैनात असतात. त्यांची क्षमता प्रचंड आहे आणि ते प्रशिक्षित असतात शिवाय त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे असतात. सुरक्षेत एसपीजीपाठोपाठ पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. सभेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान जाणार असतील तर वाहतूक बंद ठेवली जाण्याबरोबरच आधी पोलीस वाहने त्या मार्गावर कोणताही अडथळा नाही याची खात्री करतात असे असताना हे आंदोलक आले आणि त्यांना मज्जाव झाला नाही हे गंभीर आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे खराब हवामानामुळे ऐनवेळी बाय रोडचा निर्णय झाला असताना तो आंदोलकांना कसा कळला? तिसरे – पंतप्रधानांसाठी रस्ता प्रवासात नेहमीच आणखी एक पर्यायी मार्ग निश्चित केला जातो, या केस मध्ये तो नव्हता का ? रूट प्रोटोकॉल पाळला गेला अथवा नाही ? असे काही थेट प्रश्न आणि काही अस्तररुपी प्रश्न समोर येतात. सभेच्या गर्दीचा आणि दौरा रद्द करण्याचा संबंध येतो का ? विकास कामांचे उदघाटन/ भूमिपूजन किंवा काय ते असताना सभेचा प्रश्न असू शकतो का ? प्रश्नांचीही रॅली या संपूर्ण प्रकरणानंतर लागली आहे, या रॅलीला संबोधणारी उत्तरे मिळाली पाहिजेत.