तब्बल ५० लाखाची लाच घेताना ; जलसंधारण अधिकाऱ्याला अटक
कोल्हापुरी बंधारा कामाच्या सर्वेक्षणानंतर उर्वरित देयक देण्यासाठी तीन अधिकाऱ्यांनी ८० लाख ७२ हजार ५२६ रुपयांची लाच मागितली. या लाचेच्या रकमेपैकी ५० लाख रुपये घेताना जलसंधारण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार मृद व जलसंधारण विभागाच्या निविदा १० वर्षांपासून घेत आहेत. त्यांनी मार्च २०२२ मध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम निविदा भरून मिळवले.
हेही वाचा :- पैसे न दिल्याच्या कारणाने, मुलाने केला पित्याचा खून
हे काम १८ एप्रिल २०२२ रोजी पूर्ण झाले. कंत्राटदाराला नागपूर आणि वर्धा येथील कामाचे ६२,८२,०९८ रुपयांचे देयक नागपूर कार्यालयातून तर १ कोटी २६ लाखांचे देयक चंद्रपूर कार्यालयाकडून मिळणार होते. हे संपूर्ण देयक मंजूर असून नागपूर व वर्धा जिल्ह्यातील बिलाची २०,५५,९३९ ही ४० टक्के रक्कम तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील देयकाची ४९ लाख ४९ हजार ही ४० टक्के रक्कम कंत्राटदाराला धनादेशाद्वारे प्राप्त झाली होती.
नागपूर येथील जिल्हा जलसंधारण तथा प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी (वर्ग-१) कविजीत पाटील, चंद्रपूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी (वर्ग १) श्रावण शेंडे यांच्यासह चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण कार्यालयातील लेखाधिकारी रोहित गौतम याने उर्वरित देयक देण्यासाठी ८०, ७२, ५३६ रुपयांची मागणी केली.
मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा – सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला महत्वाची सूचना
या प्रकरणात कविजीत पाटील याने १९ लाख २२ हजार ५३६, श्रावण शेंडे याने टक्केवारीने ५६ लाख आणि लेखाधिकारी रोहित गौतम याने साडेपाच लाख रुपयांची लाच मागितली होती.
या तिघांनी एकूण ८०,७२, ५३६ रुपयांची मागणी केली. एसीबीच्या नागपूर उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी २ व ३ मे रोजी पडताळणी केल्यानंतर सापळा लावला. ३ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील कार्यालयात सापळा लावला.
जिल्हा जलसंधारण अधिकारी (वर्ग-१) श्रावण शेंडे यास तिघांकरिता मिळून ५० लाख रुपये लाच घेताना अटक केली. नागपूर कार्यालयातील एसीबीच्या पोलिस उप अधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलिस निरीक्षक सचिन मते, सारंग मिराशी, प्रवीण लाकडे, चंद्रपूर एसीबीचे जितेंद्र गुरुनले आदी कारवाईत सहभागी होते.