लाईट हाऊस कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचे काम सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या कौशल्य विकास केंद्राची इमारत उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील N-5 येथील कम्युनिटी सेंटरमध्ये हे केंद्र सुरू करण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी चे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी आणि लाईटहाऊस फाउंडेशन एनजीओ यांच्यातर्फे औरंगाबाद शहरासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
शहरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या कार्यक्रमांतर्गत तरुणांना विविध प्रकारच्या कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये ब्युटी पार्लर, फ्रंट डेस्क, एसी रिपेरिंग यांसारख्या विविध कोर्सचा समावेश आहे. हे कौशल्य विकास केंद्र शहरातील N- 5 मधील कम्युनिटी सेंटर येथे होणार आहे. यासाठी कम्युनिटी सेंटरच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच कौशल्य विकास केंद्र येथे सुरू होईल. यासाठी संगणक आणि इतर साहित्यांचा पुरवठा देखील औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे करण्यात आला आहे.
या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मार्च ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत फाउंडेशन अभ्यासक्रमांसाठी एकूण 358 तरुणांनी नावनोंदणी केली आहे. त्यापैकी 275 तरुणांनी त्यांचा फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आतापर्यंत 41 उत्तीर्णांना रोजगार मिळाला आहे. या कार्यक्रमाच्या विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी 201 तरुणांनी नोंदणी केली आहे तर 103 जणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. सध्या लाईटहाऊसची रामनगर, मिसारवाडी, पदमपुरा, राजा बाजार, गणेश कॉलनी, हर्सूल, नागसेननगर, नंदनवन कॉलनी आणि पहाडसिंगपुरा येथे प्रशिक्षण केंद्रे आहेत. या केंद्रांवर 95 प्रशिक्षणार्थी आहेत. दरम्यान, वेदांतनगर, श्रेयनगर, नाथ सुपर मार्केट-औरंगपुरा येथे नवीन केंद्रे सुरू होणार आहेत.