प्रतीक्षा संपली..! आज उघडणार संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा, पहिले नाटक असेल फ्री
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून बंद असलेले संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा आज उघडत आहे. नाट्यगृहाची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्यामुळे नुतनीकरणासाठी नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. चार वर्षांपूर्वी २५ मार्च २०१८ रोजी ‘सर्किट हाऊस’ या नाटकाचा शेवटचा प्रयोग याठिकाणी झाला होता. तेव्हापासून हे नाट्यगृह बंद होते.
जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे उद्घाटन पार पडले. आज १० फेब्रुवारीपासून या नाट्यगृहाचा पडदा खऱ्या अर्थाने उघडत आहे. आज पहिल्यांदाच पुन्हा एकदा येथे नाटकाची घंटा वाजणार आहे. शुभारंभाचा पहिला प्रयोग शिवसेनेच्या वतीने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आयोजित केला आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींसाठी हा प्रयोग मोफत असणार आहे. ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचा प्रयोग आज संत एकनाथ रंगमंदिरात मोफत दाखवण्यात येणार आहे. पहिल्यांदा येणाऱ्यास संधी दिली जाईल, असे शिवसेनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
अष्टविनायक प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या नाटकात निर्मिती सावंत आणि अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका आहे. नाट्यप्रेमींनी कोरोनाचे नियम पाळून या प्रयोगाला उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी सभापती राजू वैद्य, शहरप्रमुख विजय वाघचौरे, शिल्पाराणी वाडकर यांनी केले.