शिवसेनेत जाणार का या प्रश्नावर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणतात …
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात मनसेला जोरदार धक्का बसला आहे. कारण रुपाली पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत, राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.तिकडे औरंगाबाद मध्येही धुसफूस सुरु आहे. अशावेळी मनसेचे माजी आमदार आणि राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. कारण ठाकरे पुण्यात येताना नांदगावकर तातडीने मुंबईला परतले. या चर्चेनंतर मौन सोडत बाळा नांदगावकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चा या केवळ अफवा आहेत असे स्पष्टीकरण मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले आहे. मी आज तुम्हाला प्रतिक्रिया देतोय ते मनसेच्या शिवडी गडाच्या कार्यालया बाहेर उभा राहून, या सर्व चर्चा सोशल मीडियावर जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मी कुठेही जाणार नाही. शनिवारी माझ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी राजसाहेब ठाकरे येत आहेत. यासाठीची तयारी करायची म्हणून मी मुंबईत परतलो, असेही ते म्हणाले आहेत.