मुंबईत नवीन वर्षात नो सेलिब्रेशन – पालकमंत्र्यांनाचा निर्णय
मुंबई शहरात वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या चिंताजनक आहे, मागील काही दिवस २५० ते ३०० पॉझिटिव्ह रुग्ण असायचे, मात्र गेल्या २४ तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे.
यामुळे मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशन पार्टीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षानिमित्त सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम तसेच पार्ट्या होत असतात, यासर्व पार्ट्या रद्द करण्याचा निर्णय मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका मुख्यालयात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोनाशी संबंधित माहिती दिली.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. तरी देखील काळजी घेणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कोरोना निर्बंधांचे सर्वांना पालन करणे आवश्यक आहे. निर्बंधांचे उल्लंघन करून हॉटेल, रेस्टोरंट्स सुरू झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. इमारतींच्या टेरेसवरील पार्टीबाबतही लोकांनी फेरविचार करावा असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असले तरी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करणे, अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.