किरीट सोमय्यांना ‘या’ तारखेला हजर राहण्याचे आदेश, घरावर लावली नोटीस
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांत संदर्भात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अटक टाळण्यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने किरीट सोमय्या यांची याचिका काल फेटाळून लावली तर नील सोमय्या यांची याचिका आज फेटाळून लावली आहे.
दरम्यान, आज मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज किरीट सोमय्या यांनी नोटीस लावली आहे. तसेच १३ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आज अचानक किरीट सोमय्या यांच्या मुलुंडमधील निवासस्थानी गेले होते. तेव्हा किरीट सोमय्या हे घरी नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरावर नोटीस लावली. यावेळी पाच ते सहा पोलीस हजर असून काही पोलीस हे सध्या वेशात होते तर काही वर्दीत होते. त्यानंतर त्यांनी सोमय्या यांच्या कार्यालयात काही कागदपत्रांची तपासणी केली. तसेच १३ एप्रिलपर्यंत किरीट सोमय्या यांनी हजर राहण्याचे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.
किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून संपर्कात नव्हते. त्यानंतर आज सकाळी किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ समोर आला. यात त्यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांसमोर येणार असल्याचे सांगितले.