केतकी चितळेच्या अडचणीत वाढ ; अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटकेत असलेल्या केतकी चितळेला रबाळे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात तिच्यावर २०२० मध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा :- भाजपच्या माजी आमदार पती पत्नीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल
परंतु आठ महिन्यांपूर्वी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळूनदेखील तिला अटक केलेली नव्हती. अखेर तक्रारदाराने पुन्हा मागणी केल्यानंतर गुरुवारी तिला अटक करण्यात आली.
केतकीला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामुळे बुधवारची रात्र ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर गुरुवारी तिचा गोरेगाव पोलीस ताबा घेण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नवी मुंबई पोलिसांनी तिला अटक केली.
अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल सोशल मीडियावर केतकीने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. याप्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी तक्रार केली असता २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात केतकी व सूरज शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यामध्ये अटक टाळण्यासाठी तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.