हातोड्याने ठेचून पत्नीने केला पतीचा खून, तरी पोलिसांकडून सुटका! काय आहे कारण…
तामिळनाडू : गुन्हेगारी घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अन्याय, अत्याचार अशा अनेक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळतात. एखाद्या महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याचं तुम्ही आजवर ऐकलं असेल. मात्र, हत्या केल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगाराला सोडून दिल्याचं क्वचितच ऐकलं असेल. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. येथील एका महिलेनं हातोड्याच्या साहाय्याने आपल्या पतीची हत्या केली.
याप्रकरणी या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अचानक पोलिसांनी महिलेची सुटका केली. 41 वर्षीय महिलेला भारतीय दंड संहितेच्या कलम 100 अंतर्गत सोडण्यात आलं आहे. धोक्याच्या प्रसंगी स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार याद्वारे प्राप्त होतो. ही महिला तिच्या पतीसोबत राहत होती. सदर घटना घडली तेव्हा तिची 20 वर्षांची मुलगीही तिथे होती.
या महिलेच्या पतीला दारूचं व्यसन होतं. दारूच्या नशेत तो पत्नीवर अत्याचार करायचा आणि तिच्याकडून दारू विकत घेण्यासाठी पैसेही मागायचा.गुरुवारी रात्री घरी आल्यानंतर महिलेचा पती दारूच्या नशेत होता. यावेळी मात्र दारूच्या नशेत त्याने आपल्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असा त्याच्यावर आरोप आहे. यानंतर महिलेनं पतीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्याने पत्नीवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेनं स्वत:ला आणि मुलीला वाचवण्यासाठी पतीवर हातोड्यानं वार करत ठार केलं. यानंतर तिने शेजाऱ्यांना याची माहिती दिली आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
यात महिलेच्या पतीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे महिला आणि तिच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले. मात्र,चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले आणि हा खून स्वसंरक्षणार्थ झाल्याचा समज झाला. या प्रकरणी सुरुवातीला कलम (302) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर त्याचे आयपीसी कलम 100 मध्ये रूपांतर करण्यात आले आणि त्यानंतर महिलेची सुटका करण्यात आली. या महिलेला पुन्हा अटक होणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.