मोबाईल, लॅपटॉपसह चारचाकी वाहने महागणार ?
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सतत घसरत असून नीचांकी पातळी गाठली आहे. याचा नजीकच्या काळात सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार आहे.
या घसरणीचा उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आयात महागल्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून परिणामी, ऐन दिवाळीच्या तोंडावर देशात महागाई आणखी भडकणार आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया झपट घसरत आहे. सोमवारी १ डॉलरची किंमत ८२.४० रुपये झाली. हा रुपयाचा सार्वकालिक नीचांक आहे. मागील १ वर्षात रुपया १० टक्क्यांनी घसरला आहे. याचा फटका बसून देशात महागाई भडकेल, असे आणकारांनी सांगितले. रुपयाच्या घसरणीमुळे कच्च्या तेलाची आयात महागणार आहे. सध्या इंधनाचे दर स्थिर असले तरी ते वाढू शकतात.
कारचे २५ टक्के सुटे भाग होतात आयात
रुपयाच्या घसरगुंडीचा मोठा फटका वाहन उद्योगास बसेल. कारण वाहन उत्पादनात वापरले जाणारे २५ टक्के सुटे भाग विदेशातून आयात होतात. डॉलर महागल्याने ही आयात महागली आहे. त्यामुळे वाहनांचा उत्पादन खर्च वाढून किमती वाढतील.
ऐन दिवाळीत या वस्तू भडकण्याची भीती
रुपयाच्या घसरगुंडीचा सर्वाधिक फटका मोबाइल व लॅपटॉप उद्योगास बसेल. कारण मोबाईलमध्ये वापरले जाणारे ४०% सुटे पार्ट विदेशातून आयात होतात. टॅब आणि लॅपटॉप ही उत्पादने तर पूर्णतः आयातीवरच अवलंबून आहेत. या सर्वांच्या किमती ऐन दिवाळीत वाढण्याची भीती आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही बसणार फटका
घरगुती वापरासह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन आयातीवर अवलंबून आहे. रुपया घसरल्यामुळे त्याच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होईल. येणाऱ्या महिन्यांत या वस्तूंच्या किमती वाढतील.