इंस्टा रीलवरून वाद ! मैत्रिणीच्या आईवर ब्लेडने वार
औरंगाबाद :- मिटमिटा परिसरात इंस्टाग्राम व्हिडिओ रीलवरून झालेल्या वादातून तरुणांनी थेट मैत्रिणीच्या आईवर हल्ला करत गंभीर जखमी केल्याचे समोर आले. याप्रकरणी छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर आरोपीला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर त्याचा साथीदार अल्पवयीन असल्याने नोटीस देऊन त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही वाचा :- श्वान भुंकत असल्याने ; निवृत्त कृषी अधिकाऱ्याने श्वानावर बंदुकीने गोळी झाडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील रीलवरून पालाश ऊर्फ अविनाश पाटील (१९, रा. तारांगण सोसायटी) याचा मैत्रिणीसोबत वाद झाला होता. त्यामुळे याचा राग आल्याने अविनाशने आपल्या एका अल्पवयीन मित्राला सोबत घेऊन वाद झालेल्या मैत्रिणीचं थेट घर गाठलं. तसेच आमच्याकडे तुमच्या मुलीचे काही व्हिडिओ आहेत, तुम्हाला दाखवतो, असे मैत्रिणीच्या आईला म्हणाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे सुरुवातीला जखमी महिलेने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण अविनाश काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.
महिलेच्या गळ्यावर थेट ब्लेडने केला वार
जखमी महिलेसोबत वाद घालतानाच, आता व्हिडिओ तुम्हाला न दाखवता तुमच्या मुलाला पाठवतो असं दोघेही म्हणाला. याचवेळी नेमके कशाचे व्हिडिओ आहेत आणि ते मला दाखवा म्हणत जखमी महिलेने अविनाशचा मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत अविनाश आणि त्याच्या मित्राने महिलेचे तोंड दाबले. तर पाहता-पाहता महिलेच्या गळ्यावर थेट ब्लेडने वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली, तर माहिती कळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्यावर अविनाश आणि त्याचा अल्पवयीन मित्र तेथून फरार झाले. पोलसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर, तत्काळ अविनाशचा शोध सुरु केला. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात दोघेही वाळूजच्या दिशेने पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी त्यांच्या शोध घेत, दोघांना एएस क्लब परिसरातून ताब्यात घेतले. तर त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, जखमी महिलेची मुलगी व अल्पवयीन आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. विशेष म्हणजे दोघेही अकरावीत शिक्षण घेतात, तर अविनाश प्रथम वर्षाचे शिक्षण घेतो. सोशल मीडियावरील रीलवरून त्यांच्यात झालेल्या वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.