तब्बल दोनवर्षानंतर विठुरायांचे करता येणार पदस्पर्श, १ एप्रिलला होणार पंढरपूर मंदिर निर्बंधमुक्त

पंढरपूर: कोरोनामुळे मंदिरांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यातच पंढरपूर येथे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर देखील निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षांच्या विठुभक्तांना विठ्ठल-रुक्मिणीचे जवळून दर्शन घेता आले नाही. मात्र १ एप्रिलपासून भक्तांना विठुरायाला पदस्पर्श करता येईल. तसेच देवाची चंदन उटी पूजा , नित्य पूजा , पाद्य पूजा भाविकांना करता येईल.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा होण्याची शक्यता आहे.

पदस्पर्श दर्शनामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका होता. त्यामुळे पदस्पर्श दर्शनही बंद करण्यात आले होते.नंतरच्या काळात राज्यातील मंदिरेही बराच काळासाठी बंद होती. या काळात आषाढी वारीही झाली नव्हती. त्यामुळे वारकरी वर्ग नाराज होता. यावरून वारकऱ्यांनी अनेकदा आंदोलनही केले होते. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे राज्य सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हते. मात्र, आता कोरोनाची साथ पूर्णपणे ओसरल्यानंतर राज्य सरकारने विठ्ठल-रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे विठुभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *