वकील गुणरत्न सदावर्तेच्या पोलीस कोठडीत पुन्हा ४ दिवसांची वाढ
वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली. सदावर्तेंना सातारा न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सातारा पोलिसांनी सदावर्तें यांचा ताबा घेतला आहे.
२०२० मध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते आणि त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे.
सरकारी वकील पठाण यांनी सदावर्तेंना १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपीचे वागणं आणि आरोपीने केलेले आक्षेपार्ह वक्त्यव्य याच्यात आणखी कोणाचा हात आहे. त्याव्यतिरिक्त आरोपीला कोणी मदत केली आहे, या सर्व तपासासाठी पठाण या सरकारी वकिलांनी सदावर्तेंना १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यांनतर सदावर्ते यांच्यासह १०९ जणांवर मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, यामध्ये सदावर्तेंची पत्नी जयश्री पाटील हिचा देखील समावेश आहे. त्यांनतर सातारा पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सदावर्तेंच्या ताब्यासाठी अर्ज केला होता त्यानुसार काल मुंबई पोलिसांनी त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे दिला आहे. त्यानंतर आज सातारा न्यायालयात त्यांना हजर केले होते.