महिला वनरक्षकाला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ माजी सरपंचाला अटक
सातारा : जिल्ह्यातील पळसवडे गावचे माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने एका गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संताजपनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. तसेच त्याला आज सकाळी अटक देखील झाली आहे.
मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली आहे.महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. त्यात धक्कादायक म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. ही संतापजनक घटना समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे. या घटनेची दाखल घेत महिला आयोगाने सातारा पोलिसांना त्या माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्या सरपंचावर भारतीय दंड संहिता कलम ३५६,३३२,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.