पोलीस आयुक्तांच्या ट्विटवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणले आयुक्तांचे आभार मानले पाहिजे
सध्या हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याचा राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा आहे, त्यात राणा दाम्पत्य हे अगदी अग्रस्थानी घेतल्या गेलेलं नाव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसाचं पठाण करण्यास गेलेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. त्या नंतर खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांनी जातीवाद केल्याचा आरोप केला.
‘मला २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. संपूर्ण रात्र मी तिथे होते. यादरम्यान, तहान लागल्याने मी पिण्यासाठी पाणी मागितले पण ते दिले गेले नाही. मी मागासवर्गीय असल्याने इतरजण वापरत असलेल्या ग्लासमधून तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे ड्युटीवरच्या पोलिसांनी मला सांगितले. हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. मला बाथरूमही वापरू दिला गेला नाही. जातीवरून हिणवत माझा छळ करण्यात आला. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली,’ असा दावा नवनीत राणा यांनी लोकसभाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केला होता. याला खोटे ठरवण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला त्यात खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्य चहा पाणी घेत होते.
संजय पांडे यांनी केलेल्या ट्वीटनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. राणा दाम्पत्याने मुंबई पोलिसांवर खोटे आरोप लावलेत. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी मुंबई पोलीस दलावर खोटे आरोप लावणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी म्हटले. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बिनबुड्याच्या आरोपांना पुराव्यासकट उत्तर दिले असून देशाने संजय पांडेंचे आभार मानले पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले. राणा यांच्याशी मुंबई पोलीस सौजन्याने वागले असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी म्हटले.