धक्कादायक । खून झालेला व्यक्ती झाला तब्बल ६ वर्षांनी जिवंत, २ आरोपीना नाहक ६ वर्षाचा कारावास
गुजरातमध्ये चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी घटना घडली आहे. तुरुंगात ६ वर्षांपासून दोन जण ज्या व्यक्तीच्या हत्येची शिक्षा भोगत होत ती व्यक्ती जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. यावर गुजरात न्यायालयाने दोघांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. गुजरात न्यायालयाने हत्येच्या आरोपातून तुरुंगात असलेल्या दोन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. दोन जण ज्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी ६ वर्षांपासून तुरुंगात होते ती व्यक्ती जिवंत सापडली आहे.
हाती आलेल्या माहिती नुसार, याप्रकरणी गुजरात न्यायालयाने ३० मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात तपास अधिकारी आणि तत्कालीन नवसारीस्थित निरीक्षक प्रदीप सिंह गोहिल यांना निष्काळजीपणे तपास केल्याबद्दल प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. आदेश सुनावताना न्यायालयाने म्हटले की, या तपास अधिकाऱ्यांमुळे दोन्ही व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक त्रासातून जावे लागले. तसेच यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ६ जुलै २०१६ रोजी मदन पिपलाडी आणि सुरेश बटेला यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ती व्यक्ती जिवंत सापडल्यानंतर न्यायालयाने अटकेत असलेल्या दोघांचीही १५ दिवसांत निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
योग्य माहिती मिळूनही पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र गयारी नामक व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले होते. गयारीच्या कुटुंबियांनी चुकीची ओळख पटल्याने दुसऱ्याचं मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, अंत्यसंस्काराच्या काही तासांनंतरच कुटुंबियाना गयारी जिवंत असून नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी ही बातमी पोलिसांना दिली मात्र यानंतरही पोलिसांनी आरोपी विरोधात खोटे आरोपपत्र दाखल करत दोघांनी गयारीची हत्या केल्याचं म्हटलं.