Uncategorizedमहाराष्ट्र

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञाताकडून हल्ला

Share Now

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद अजून संपलेला नाही तोच आता रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची किरकोळ तोडफोड झाली असून रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

मुक्ताईनगरकडे येत असताना अज्ञाताकडून हल्ला
मिळालेल्या माहितीप्रमाणे रोहिणी खडसे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे हळदी समारंभात गेल्या होत्या. या कार्यक्रमाला हजेरी लावून त्या मुक्ताईनगरकडे आपल्या गाडीत परत येत होत्या. यावेळी त्यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने अचानकपणे हल्ला केला. यामध्ये रोहिणी खडसे प्रवास करत असलेल्या गाडीचा काच फुटला आहे. तर खडसे यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली.

हल्लेखोराचा तपास करुन कारवाई करा- रुपाली चाकणकर
रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच अशा प्रकारचा हल्ला करणारे हल्लेखोर सुटता कामा नयेत असे म्हणत त्यांनी जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे हल्लेखोरांचा तपास करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *