देश

दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवणार – धनंजय मुंडे

Share Now

राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवून देण्यासाठी राज्यात दि. १२ डिसेंम्बर २०२१ ते १२ मार्च २०२२ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन असतो, याच निमित्ताने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ व दिव्यांग धोरणानुसार केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्व २१ प्रकारातील दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी कार्ड धारक असणे बंधनकारक आहे. मागील दोन वर्षात सततचे लॉकडाऊन, कोविड संसर्गाचा धोका तसेच मर्यादित वैद्यकीय सुविधांमुळे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. यामुळे ही विशेष मोहीम सबंध राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
या मोहिमेअंतर्गत कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागात जिल्हा व तालुका स्तरावर मोहीम राबवली जावी, यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या प्रभावी अंमलबजावणी करिता स्थापन समितीच्या माध्यमातून आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयाने निर्धारित वेळेत प्रमाणपत्र मिळवून देण्याचे नियोजन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
या मोहिमेंतर्गत दिव्यांग व्यक्तींना सोयीच्या व जवळच्या ठिकाणी नोंदणी शिबिरे आयोजित करावीत व दिव्यांगत्वाच्या 21 प्रकारानुसार तपासणी साठी तेथे तज्ञ लोक उपलब्ध करून घ्यावेत असेही निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबाजवणी करिता महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्तांच्या तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समाज कल्याण, सार्वजनिक आरोग्य आदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी किंवा समाज कल्याण अधिकारी यांपैकी एकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व शासन निर्णयात दिलेल्या कृती आराखड्यानुसार जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींची नोंदणी केली जावी व त्यांना युडीआयडी प्रमाणपत्र मिळवून द्यावेत, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *