प्रकृती खंगलेली, अशक्तपणा, एका पोलीस अधिकाऱ्याची कोणी केली ही अवस्था ?
जालना : जालन्यातील एसीबीचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे गेल्या काही दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडले आणि अचानक गायब झाले होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून जालना पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर १३ दिवसांनी संग्राम ताटे सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे अत्यंत विचित्र अवस्थेत पोलिसांना सापडले. त्यामुळे त्यांच्या सोबत नेमकं काय घडलं? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
खंडाळा येथील महामार्गावरील जुना टोलनाका येथे ते सापडले. दोन दिवसांपासून एकाच ठिकाणी पडून असल्यामुळे पुरेसे जेवण मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. खंडाळा येथील एका कामगाराने ताटे यांची परिस्थिती पाहून त्यांना जेवायला दिले. आपण कोण, कुठले अशी विचारणा केली असता, ते काहीच बोलत नव्हते. पण त्यांच्या हातावर एक मोबाइल नंबर लिहिलेला होता. कामगाराने त्या नंबरवर फोन केला असता तो त्यांच्या पत्नीचा होता. त्यानंतर कामगाराने दिलेल्या माहितीवरून खंडाळा पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर जालना पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली. ताटे यांना सध्या जालन्यात त्यांच्या घरी आणले असून औषधोपचार सुरु आहेत. मात्र ते दोन दिवस अशा अवस्थेत का होते, त्यांचे कुणाशी वाद झाले होते का? कुणी त्यांना धमकावण्याचा, अपहरणाचा प्रयत्न केला होता का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. एका क्लास वन पोलीस अधिकाऱ्याची अशी अवस्था कोणी केली? आणि का? हा पण एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.