आम्ही तर बाळासाहेबांना सांगू, की नाही बाळासाहेब, आम्ही संघर्ष केला.- देवेंद्र फडणवीस
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी भाजप आक्रमक, भाजपाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपानं नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढला असून यावेळी विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली.
“शरद पवार म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल, सोडून द्या. पण एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, अशी व्यक्ती तुमच्यासोबत मंत्रिमंडळात होती. तेव्हा काय उत्तर द्याल ? आम्ही तर बाळासाहेबांना सांगू, की नाही बाळासाहेब, आम्ही संघर्ष केला. पण काय करणार, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. ते सत्तेसाठी एवढे आंधळे होते, की ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं, की राजीनामा घेतला, तर माझं सरकार जाईल”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.