टीव्ही सेंटर खून प्रकरण; २४ दिवसांनंतर आरोपी ताब्यात
औरंगाबाद : टीव्ही सेंटर येथील खुनाचा उलगडा करण्यात सिडको पोलिसांना तब्बल २४ दिवसांनंतर यश आले आहे. याप्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेल्या दोन तरुणांपैकी एकाला बोलते करण्यास पोलिसांना यश आल्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली आहे. अयाज खान बशीर खान (वय.३६,रा.रेहमानिया कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी.व्ही सेंटर येथील व्यापारी संकुलाच्या पाठीमागील स्टेडियमच्या पायऱ्याखालील मोकळ्या गाळ्यात सिध्दार्थ साळवेचा डोक्यात दगड मारून त्यानंतर शरीर अर्धवट जाळून निर्घृण खून करण्यात आला होता. गेली २२ दिवस पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत होते. दरम्यान याच भागात दारु पिऊन रात्री स्टेडीयमच्या परिसरात झोपणाऱ्यापैकीच कोणीतरी सिध्दार्थचा खून केल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीसांनी संशयितांची कसुन चौकशी सुरु केली. चौकशीअंती अयाज खान यानेच सिध्दार्थचा खून केल्याचं तपासात सिद्ध झाले.
त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. अयाजची चौकशी केली असता, मयत सिध्दार्थ साळवे याने घटनेच्या रात्री दारू पिऊन अयाजला शिवीगाळ केली होती. त्यातून दोघांमध्ये भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात आयजने सिध्दार्थ साळवे याचे डोक्यावर दगड मारून त्याचा खून केला व नंतर त्यास पेटवून दिले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.