ठेकेदारांसाठी नाही तर लोकांसाठी काम करा…!- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद – औरंगाबाद शहर विकास कामांच्या बाबतीत जादुई नगरी आहे, इथे कोणत्यावेळी काय सुरु होईल आणि काय बंद होईल याचा नेम नाही. आता हेच बघा ना काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका रस्त्याचे भूमिपूजन केले. या रस्त्याचे हे चौथ्यांदा झालेले भूमिपूजन होते. या वेळी झालेल्या समारंभात ही माहिती जाहीरपणे दिली गेली. गारखेड्यातील शिवनेरी कॉलनीतील विजय चौक इथे रस्त्याचे चौथ्यांदा भुमीपूजन होत असल्याचे राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. तेव्हा हाच धागा पकडून शिंदे म्हणाले, या रस्त्याच्या कामाचे पाचव्यांदा भूमिपूजन होणार नाही याची दक्षता घ्या.
रस्त्याचे काम दर्जेदार करा आणि वेळेत पूर्ण करा. निधीचा विनीयोग योग्य प्रकारे झाला पाहिजे. ठेकेदारांसाठी नव्हे तर लोकांसाठी काम करा. औरंगाबादेत होणाऱ्या विकास कामांमध्ये जनतेचे हित कायम दुर्लक्षिले जाते आणि ठेकेदार-लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या फायद्याचे प्राधान्यकर्म ठरतात. हे तमाम शहराला माहिती आहे, हीच बाब नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हेरली आणि वरील वक्तव्य केले. आता त्यांची पाठ फिरली की पुन्हा हेच होणार अशी चर्चा यावेळी उपस्थित करत होते.