ट्रकने उडवले अन महिला डॉक्टरचा मॉर्निंग वॉक अखेरचा ठरला…
कोरोना काळात देवदूत बनून डॉक्टर या नात्याने अवघ्या गावाला आरोग्य सेवा पुरवून गांधेलीतील ग्रामस्थांची काळजी घेणाऱ्या महिला डॉक्टरचा गुरुवारी पहाटे ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. पतीसमवेत मॉर्निंग वॉकला निघालेले असताना या दाम्पत्याला ट्रकने चिरडले. यात या महिला डॉक्टरचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती जखमी झाले. डॉ. लीला नामदेव भुजबळ (४५, रा. गांधेली) असे या महिलेचे नाव असून, त्यांचे पती नामदेव भुजबळ जखमी झाले आहेत.
हेही वाचा :
- अग्निपथ भरती योजना: 10वी उत्तीर्ण ‘अग्निवीर’ना मिळणार डायरेक्ट 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- गर्लफ्रेंडने मागितली सोन्याची अंगठी म्हणून बॉयफ्रेंडने केला खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराला लागून असणाऱ्या गांधेली गावात राहणाऱ्या डॉ. लीला व त्यांचे पती नामदेव हे भुजबळ दाम्पत्य गेल्या दोन महिन्यांपासून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नियमित मॉर्निंग वॉकसाठी जात. गांधेली ते झाल्टा फाटा व परत असा त्यांचा नित्यनियम असे. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे फिरायला निघाले होते. पती पुढे तर डॉ. लीला मागे, असे ते चालत होते. याचदरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने डॉ. लीला यांना जोरदार धडक दिली. नंतर त्यांच्या पतीलाही धडक दिली.
या अपघातात डॉ. लीला यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या मागेपुढे मॉर्निंग वॉक करणारे तसेच ग्रामस्थ आदींची त्यांच्या मदतीसाठी धावले. तोपर्यंत त्यांना धडक देणारा ट्रक घटनस्थळावरून पळून गेला होता. डॉ. लीला यांना तातडीने धूत रुणालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र अति रक्तस्राव झाल्याने काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतीवर उपचार सुरु आहेत. या दाम्पत्याला दोन मुली व एक मुलगा आहे.