छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज औरंगाबादेत दाखल होणार
औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात बसवण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज औरंगाबाद शहरात दाखल होत आहे. शुक्रवारी तो पुण्याहून औरंगाबादकडे येण्यासाठी रवाना झाला. शिल्पकार दीपक थोपटे यांच्या नऱ्हे येथील स्टुडिओत सकाळी पूजन करून नंतर दोन क्रेनच्या मदतीने हा पुतळा १६ चाकी आणि ४० फूट लांब ट्रकमध्ये विराजमान करण्यात आला.
औरंगाबादच्या क्रांती चौकात उभारण्यात येणारा हा पुतळा देशातील इतर अश्वारुढ पुतळ्यांपेक्षा सर्वाधिक उंचीचा आहे. या पुतळ्याची एकूण उंची २५ फूट आहे तसेच लांबी २१ फूट आहे. त्यामुळे एवढ्या उंचीच्या पुतळ्याचा पुण्याहून औरंगाबादेत थेट प्रवास करणे शक्य नसल्याने पुतळ्याचे सुटे भाग करून ते शहरात आणले जातील. महाराजांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, हा यामागील उद्देश आहे. तसेच आज रविवारी शहरात दाखल झाल्यानंतर ते भाग एकत्र जोडले जाऊन महाराजांचा भव्य उंचीचा पुतळा तयार करण्यात येईल.
पुतळ्याची वैशिष्ट्ये काय ?
शिवाजी महाराजांचा हा पुतळा २५ फूट उंच असून त्याची लांबी २१ फूट एवढी आहे. पुतळ्याचे वजन सुमारे ८ टन आहे. तर पुतळ्या भोवतीचा क्रांती चौकातील चौथरा ३१ फुटांचा आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ३ कोटी ५३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. पुतळ्याभोवतीचा चौथरा आणि त्याभोवतालची सुशोभीकरणाची कामे ९ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती शहर अभियंते सखाराम पानझडे यांनी दिली. या चौथऱ्याभोवती विविध शिल्प, म्युरल्स, कारंजे आदींची कामे वेगात सुरु आहेत.
१० फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे., आज शहरात पुतळ्याचे आगमन झाले तरी तो तसाच झाकून ठेवला जाईल. १० फेब्रुवारी रोजी त्याचे अनावरण करण्याची तयारी शहरात सुरु आहे. .