रिक्षाचालकाने विचारले अश्लील प्रश्न, मुलीने धावत्या रिक्षातून घेतली उडी
औरंगाबाद :- रिक्षाचालकाने अश्लील प्रश्न विचारून चालकाने रिक्षा भरधाव पळविल्यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने त्या रिक्षातून उडी घेतली.
यावेळी मागून येणाऱ्या कारच्या खाली जाण्यापासून मुलगी थोडक्यात बचावली, परंतु भरधाव रिक्षातून उडी घेतल्याने तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सिल्लेखाना चौकानजीक रस्त्यावरील संकल्प क्लासेससमोर रविवारी (दि. १३) दुपारी १२.२५ वाजता ही खळबळजनक घटना घडली. क्रांतीचौक ठाण्यात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सय्यद अकबर सय्यद हमीद (३१, रा. प्लॉट नं. १५६, कैसरबाग, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी सांगितले की, शहरातील एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणारी ही मुलगी शिकवणी संपल्यानंतर गोपाल टी येथून रिक्षातून एकटीच खोकडपुरा भागात घरी निघाली होती. या प्रवासात रिक्षाचालकाने तिला कौटुंबिक माहिती विचारली तुला सोबत फिरायला आवडेल का? असेही विचारले. रिक्षा सिल्लेखाना चौकातून उजवीकडे वळवून खोकडपुऱ्याच्या दिशेने निघाली तेव्हा त्याने तिला सेक्स करायला आवडेल का ? अशी विचारणा करीत रिक्षाचा वेग अचानक वाढविला. भेदरलेल्या मुलीने थेट रस्त्यावर उडी घेतली..
ती उस्मानपुण्यातील तीन क्लासेसमध्ये नीटची तयारी करते. तिला रोज सकाळी वडील नेऊन सोडतात. रविवारी क्लास संपल्यानंतर ती गोपाल टी येथून रिक्षात (एमएच २० ईएफ १५६२) बसली. पाच दिवसांपूर्वीही ती त्याच रिक्षातून घरी गेली होती. ही घटना येथील सीसीटीव्हीत कैद झाली .