औरंगाबाद खंडपीठात आजपासून सुरु होणार ऑनलाईन सुनावणी
औरंगाबादः जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडीपाठात आजपासून विविध खटल्यांची सुनावणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी व्हावी, यासाठी वकिलांसह काही न्यायमूर्तींनीही आग्रह धरला होता. मात्र खंडपीठातील काही न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणी झाली. त्यातील काहीजण बरे होऊन कामावर रुजू झाले असले तरीही पुढील धोका लक्षात घेता आजपासून ऑनलाइन सुनावणी घेण्याचा निर्णय झाला आहे.
औरंगाबाद खंडपीठात प्रकरणांच्या सुनावणीचे कामकाज मंगळवारपासून पुढील दोन आठवडे ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे. खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन चौधरी आणि सचिव अॅड. सुहास उरगुंडे यांनी दिली. खंडपीठातील काही न्यायाधीश, वकिलांना कोरोनाची लक्षणे दिसून आली असून न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोर्टात सुरु असलेली इतर कामे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी घरातूनच करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.