स्वतः अल्पवयीन मुलीने सांगितले बालविवाह झाल्याचे सत्य, मग…
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील एका अल्पवयीन मुलीचा चार महिन्यापूर्वी विवाह झाला. आरोपी प्रसाद राऊत या मुलासोबत विवाह करून दिल्याचा स्वतः मुलीने सांगितले आहे. तीन महिने पीडित मुलगी सासरी राहिली. त्यानंतर ती मुलगी अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांना आढळून आली. त्यांच्या चौकशीमध्ये गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आता वसमत शहर पोलीस ठाण्यांमध्ये पीडित मुलीच्या आई-वडिलांसह पती सासरा आणि नणंदेवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात रहिवाशी असलेल्या केशव वंजे यांनी त्यांच्या अल्पवयीन असलेल्या मुलीचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रसाद राऊत या मुलासोबत डिसेंबर २०२१ मध्ये लग्न करून दिले. लग्नानंतर पीडित मुलगी तीन महिने सासरी राहिली. त्यानंतर ती मुलगी अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांना दिसून आली. मुलगी एकटीच असल्याने रेल्वे पोलिसांनी या मुलीची आधी चौकशी करून त्या मुलीला बालसुधारगृहात पाठवले.
बाल सुधारगृहांमध्ये या मुलीची चौकशी झाल्यानंतर अल्पवयीन असताना लग्न झाल्याची पीडित मुलीने माहिती दिली आहे. त्याचबरोबर अल्पवयीन असताना पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असल्याची माहिती सुद्धा या पीडित मुलीने दिली आहे. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस स्टेशनमध्ये पीडित मुलीचे आई-वडील पीडित मुलीचा नवरा, सासरा, नणंद यांच्यावर बाल विवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे करत आहेत.