नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्य जनतेला झळ ; या जीवनावश्यक वस्तू महागणार
आज नवीन आर्थिक वर्ष २०२२ – २०२३ सुरु झाले आहे. तसेच आयकर नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आयकर (25 वी सुधारणा) नियम 2021 अंतर्गत 1 एप्रिलपासून आयकर नियमांमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला देखील बसणार आहे
औषधे महागणार
– आजपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती महागणार आहे. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे 800 औषधांच्या किंमती वाढणार आहे.
– या वर्षी घर खरेदी करणाऱ्यांना 1 एप्रिल 2022 पासून पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना आयकर कायद्याच्या कलम 80EEA अंतर्गत मिळणारा लाभ केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
– इंधन दरवाढ सुरू असताना आता घरगुती एलपीजी गॅस दरवाढीची झळ ग्राहकांना बसू शकते. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली होती. 1 एप्रिल रोजी नवीन दर जाहीर होण्याची शक्यता आहे.
पोस्ट ऑफिसच्या नियमांत मोठे बदल
1 एप्रिल 2022 पासून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यात उपलब्ध असतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केले आहे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे चेक, बँक ड्राफ्ट किंवा रोखीने देता येणार नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला युपीआय अथवा नेटबँकिंगचा वापर करावा लागणार आहे.
पीएफ खात्यावर कर
एक एप्रिल 2022 पासून विद्यमान पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते. त्यावर कर आकारणी होऊ शकते. ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.
जीएसटी नियमात बदल
CBIC (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ) ने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्याची उलाढाल मर्यादा 50 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून 20 कोटी रुपये केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीचा विशेष लाभ बंद?
कोरोना काळात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक लाभ मिळत होता. आता काही बँका या योजना बंद करण्याची शक्यता आहे.
क्रिप्टोकरन्सीवर 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू
क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागू होणार आहे. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) किंवा क्रिप्टोकरन्सी विकून मिळालेल्या नफ्यावर 30 टक्के कर लागणार आहे.
वाहने महागणार
काही वाहन कंपन्यांनी 1 एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने 1 एप्रिलपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे म्हटले आहे. टोयोटा 1 एप्रिल 2022 पासून आपल्या वाहनांच्या किमती 4 टक्क्यांनी वाढवणार आहे. BMW किमती 3.5 टक्क्यांनी वाढवणार आहे.