तृतीयपंथी सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी ; जागतिक महिला दिनी अडकले विवाह बंधनात
बीड जिल्ह्यात काही महिन्यापासून तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वादक बाळूचं प्रेम प्रकरण चर्चेत आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दोघंही लग्नाच्या नात्यात बांधले गेले. जिल्ह्यातील अनेक मान्यवर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती.
शाही लग्नाला देखील लाजवेल असा विवाह सोहळा बीड जिल्ह्यातील कंकालेश्वर मंदिरात पार पडला. हा विवाह तृतीयपंथीयांचा असून देखील या विवाहात सगळे विधी पार पाडण्यात आले. हळद, मंगलाष्टिका, मानपमान, साग्रसंगीत जेवण, अशा सगळ्या गोष्टींनी विवाह सोहळ्याची रंगत वाढली. लग्नामध्ये फक्त बीड जिल्ह्यामधूनच नाही तर आसपासच्या जिल्ह्यामधून देखील नागरिक आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील किन्नर समाजातील धर्मगुरु आवर्जून उपस्थित होते.
लग्न सोहळ्यासाठी बीडच्या सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनीच सपनाचं कन्यादान केलं. हा विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. विवाहाला उपस्थित मंडळींनी बाळू सपनासोबत फोटो काढले. अधिकाऱ्यांना देखील सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.