टाटा मोटर्सची पहिली CNG कार पुढील आठवड्यात लाँच
टाटा मोटर्स आपल्या दोन कारचे CNG प्रकार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे, टियागो आणि टिगोर सीएनजी प्रकारात उपलब्ध होतील. दोन्हीचे बुकिंगही सुरु झाले असून या मुळे मारुती आणि ह्युंदाईच्या स्पर्धेत आता टाटा देखील टक्कर देईल.
विशेष म्हणजे केवळ काही हजारात ही बुकिंग शक्य आहे. पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांचा ओढा आता सीएनजीकडे वळला आहे. याची चाहूल लागल्याने अनेक कंपन्या याकडे वळल्या. त्यात आता टाटा ची भर पडली आहे.
टाटा डीलरशिपकडे दोन्ही कारचे बुकिंग सुरू झाले आहे. कारचे अधिकृत लॉंचिंग पुढील आठवड्यात होऊ शकते. प्रवासी वाहनांच्या स्पर्धेत टाटाने उतरण्याचा निर्णय घेतल्याने मारुती सुझुकी आणि ह्युंदाई यांच्या बाजारातील वर्चस्वाला सीएनजी सेक्टर मध्ये हादरा बसतो की फरक पडणार नाही हे लवकरच कळेल.
टियागो आणि टिगोरच्या सीएनजी प्रकारांमध्ये कोणतेही मोठे डिझाइन बदल दिसणार नाहीत. नवीन सीएनजी बॅच टेलगेटवर दिसेल. कंपनीने व्हेरिएंटचे डिटेल्स अजून जाहीर केले नाहीत. मात्र सीएनजी प्रकार फक्त ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केले जातील असे कळते.
पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक या तिन्ही प्रकारांमध्ये सादर होणारी टाटा टिगोर ही एकमेव सेडान असेल. सीएनजीवर चालणारी टिगोर ह्युंदाई ऑरा सीएनजीला टक्कर देईल. टाटा टियागो सीएनजी ची स्पर्धा ह्युंदाई सँट्रो सीएनजी आणि मारुती वॅगन आर सीएनजी शी होईल.