लालपरिचा प्रवास महागणार , राज्य परिवहन मंत्री नवी घोषणा
मुंबई आणि राज्यातील प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेससह खासगी वाहतुकीसाठी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वीपासून प्रलंबित असलेल्या एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली असून, ही दरवाढ 14.95 टक्क्यांनी करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
या भाडेवाढीमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला नक्कीच फटका बसेल. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्रासह मुंबईतील प्रवाशांसाठी नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. अनेक महिन्यांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता, मात्र आता त्यावर निर्णय होऊन भाडेवाढीची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
एसटीच्या भाडेवाढीनंतर आता खासगी वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षांच्या भाड्यातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टॅक्सीचालक आणि रिक्षाचालक अनेक दिवसांपासून भाडेवाढीसाठी आग्रही होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, इंधनाचे दर वाढल्यामुळे आणि खर्चात झालेली वाढ लक्षात घेता ही भाडेवाढ गरजेची होती.
टॅक्सीच्या सध्याच्या भाड्यात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे, आधीच्या 28 रुपयांच्या तुलनेत आता टॅक्सीचे प्रारंभिक भाडे 31 रुपये होईल. त्याचप्रमाणे, रिक्षाचे सध्याचे भाडे 23 रुपये असून, नवीन दरवाढीनंतर ते 26 रुपये होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढीची अंमलबजावणी 2 फेब्रुवारीपासून केली जाणार आहे.
या निर्णयांमुळे प्रवाशांना आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या प्रवाशांसाठी ही भाडेवाढ चिंतेची बाब ठरणार आहे. त्याचवेळी, वाहनचालकांसाठी हा निर्णय सकारात्मक ठरणार असल्याचे मानले जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रवाशांसाठी नवीन दर लागू झाल्यानंतर प्रवासाचा खर्च वाढणार असला, तरी वाहतूक सेवांच्या सुधारण्यासाठी आणि वाहनचालकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. मात्र, भविष्यात भाडेवाढीचा बोजा कमी करण्यासाठी सरकारकडून काही सबसिडी किंवा पर्याय देण्यात येतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.