नितेश राणे यांच्या कोठडीत १८ फेब्रुवारी वाढ, सिंधुदुर्ग सत्र न्यायलायाचा निर्णय
संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत सुनावण्यात आली होती. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांच्यासमोर ही सुनावणी झाली आहे. आमदार नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी न्यायालयात हजर केलं गेलं. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं होत.
आमदार नितेश राणेंना पुण्याला नेऊन त्यांची चौकशी करायची आहे, त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितले. तर नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी यावर युक्तिवाद करत आरोपीला पुण्याला घेऊन जाण्याची आवश्यकता का आहे असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी देऊ नये असाही युक्तीवाद त्यांच्या वकिलाने केला.
आमदार नितेश राणेंना गोव्यातील त्यांच्या हॉटेलवर घेऊन चौकशी केली असता त्यांचा सीडीआर रिपोर्ट आणि नीतेश राणे, राकेश परब याचं तिथे झालेल्या संभाषणाची चौकशी पोलिसांनी केली आहे. त्यातून त्यांना काही माहिती मिळाली आहे, मात्र अजून चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे असं सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला. या गुन्हाची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असंही ते म्हणाले.
दोन दिवसांत झालेल्या चौकशीत आरोपीकडून मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले, अजून तपास बाकी असून पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.
आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते.