सिल्वर ओक हल्ला प्रकरणी काही पोलीस अधिकारी देखील अडकणार चौकशीत?
मुंबई : शरद पवार यांच्या घरावर झालेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे. काल या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. दुसरीकडे शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक झाली. गृहमंत्र्यांनी कालच्या घटनेचा लेखी रिपोर्ट पवारांना सादर केल्याची माहिती आहे. या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.
गृहमंत्री वळसे पाटील यांनी आज वर्षा निवासस्थानी जाण्याआधी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. पवारांची आणि वळसे पाटलांची पाच मिनिटं भेट झाली. वळसे पाटील यांनी कालच्या घटनेचा लेखी रिपोर्ट सादर केल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणात काही पोलीस अधिका-यावर जबाबदारी ठेवत कारवाईची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. गृहविभागाच्या त्रुटीबद्दल नेमकं कारण काय याची प्राथमिक माहिती या अहवालात दिल्याचं समजतं आहे.
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी एकाच सुरात पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. मीडियाला माहिती मिळते मग पोलिसांना माहिती का मिळाली नाही असा सवाल दोघांनीही विचारला आहे. पोलिसांच्या अपयशाची चौकशी व्हायला हवी असं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.