टीईटी परीक्षा घोटाळ्यात धक्कादायक खुलासा ; तब्बल २४० कोटी घोटाळा
शिक्षक परीक्षा घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा घोटाळा जवळपास २४० कोटी रुपयांचा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याकडून तीन ते चार लाख रुपये घेतल्याचे तपासा दरम्यान समोर आले आहे.
परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. शिक्षक परीक्षा घोटाळ्यात सनदी अधिकारी सुशील खोडवेकर याच्या अडचणीत वाढ झाली असून, त्याचा अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
टीईटी परीक्षेत आर्थिक गैरव्यवहार करताना प्रत्येक परीक्षार्थ्याकडून तीन ते चार लाख रुपये घेतले. त्यातून २४० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची व्याप्ती झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ७५८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. एकूण ३ लाख ४३ हजार २८४ जणांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या अंतिम निकाल यादीत १६७०५ जण पात्र ठरले. त्यांना टीईटी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ च्या परीक्षेतील पेपरफुटीत गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर परीक्षा घेणार्या कंपनीच्या अधिकार्यांपासून राज्य परीक्षा परिषदेचे संचालकही सहभागी असल्याचे दिसून आले. परीक्षेच्या अंतिम यादीतील निम्म्या परीक्षार्थ्यांकडून पैसे स्वीकारून त्यांची नावे बनावट पद्धतीने टाकण्यात आल्याचा धक्कादायक समोर प्रकार समोर आला आहे.