धक्कादायक | तीन महिन्याच्या चिमुकलीला झुडपात सोडून निर्दयी आई पसार
चापानेर : औरंगाबाद येथील शिरसगाव (ता.कन्नड) येथे गोकूळ बाबा आश्रम रस्तावर तीन महिन्याच्या मुलीला सोडून अज्ञात व्यक्ती पळून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (ता.३१) चार वाजता उघडकीस आली आहे. शिरसगाव येथील नेहरू महेर यांची मुले शाळा सुटल्यावर गावातून मळ्यातील घरी येत असताना त्यांना एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. परंतु आसपास कुणी दिसत नसल्याने त्यांनी वडील नेहरू महेर यांना आवाज देऊन बोलावून घेतले. नेहरू महेर हे आल्यानंतर त्यांना एका झाडा जवळ चिमुकली दिसून आली. त्यांनी चिमुकलीला बाहेर काढले.
या प्रकरणाची कन्नड ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक तात्याराव भालेराव व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी पाचारण केला. सध्या चिमुकलीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती बिट जमादार जैन यांनी दिली.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात बिट जमादार गणेश जैन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तात्याराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.