क्रांती चौकात झळकणार “शिवसृष्टी”, कामाला जोमात सुरवात
औरंगाबाद – शहराचे मुख्य आकर्षण क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच याचे उद्घाटन देखील होणार आहे. मात्र इथे पुतळ्याबरोबरच पुलाखाली दोन्ही बाजूला छत्रपतींचे जीवन दर्शवणारी शिवसृष्टी देखील निर्माण करण्यात येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे याचे काम सुरू करण्यात आले आहे. ते आता वेगाने सुरू आहे आणि एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण होणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक व औरंगाबाद स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य असणाऱ्या क्रांती चौक उड्डाणपुलाखाली शिवसृष्टी उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. याला जोडूनच औरंगाबाद स्मार्ट सिटी द्वारे शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. या शिवसृष्टी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट आणि त्यांचे गडकिल्ले यांची भित्तीचित्रे तयार करण्यात येणार आहेत. त्यांचे कार्य सांगणारे 26 आणि गडकिल्ल्यांची माहिती देणारे 26 असे एकूण 52 भित्तीचित्रे तयार करण्यात येणार आहेत. यासाठीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. एप्रिल अखेर हे काम पूर्णत्वास येणार आहे. या भित्तीचित्रांजवळ क्यूआर कोड देखील देण्यात येईल. हा कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित सर्व माहिती लेखी आणि ऑडियो स्वरुपात उपलब्ध होईल. या उपक्रमासाठी एकूण 2.5 कोटींचा खर्च स्मार्ट सिटी द्वारे करण्यात येत आहे.
या भित्तीचित्रांची निवड करण्यासाठी इतिहास विशेषज्ञ आणि इतिहासकारांची इतिहासकार इंद्रजित सावंत ह्यांचा नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीद्वारे निवडण्यात आलेली भित्तीचित्रे तयार करण्यात येतील. या उपक्रमाव्दारे विदेशी पर्यटक आणि पुढची पिढी यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली संस्कृती यांची माहिती मिळेल. त्याचबरोबर शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि पर्यटनाच्या दृष्टीने देखील ही शिवसृष्टी चालना देणारी ठरेल. या शिवसृष्टी साठी औरंगाबाद स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी, प्रकल्प सहयोगी किरण आढे काम पाहत आहेत. लवकरच क्रांती चौक उड्डाणपुलाखाली शिवसृष्टी नागरिकांना पाहायला मिळेल.