news

ज्येष्ठ समीक्षक, लेखक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

Share Now

मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज निधन झाले.

गेल्या दोन दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक म्हणून नागनाथ कोत्तापल्ले यांची ओळख होती. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 या दिवशी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला होता.

शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे त्यांनी पूर्ण केले होते. त्यामध्ये ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात प्रथम आले होते. त्यांनी 1980 मध्ये औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठातून डॉ. यु. म. पठाण यांच्या मार्गदर्शनाने ‘शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएचडी केली होती.

नागनाथ कोतापल्ले 1977 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी यशस्वी कारकीर्द पार पाडली होती. 2005 ते 2010 पर्यंत त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले होते. नागनाथ कोत्तापल्ले यांनी नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बाल पुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पदावर त्यांनी काम केले होते.
……………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *