औरंगाबादमधील ३०-३० घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड पोलिसांच्या ताब्यात
राज्यभरात गाजलेला ३०-३० घोटाळ्याचा मुख्य आरोपी शुक्रवारी पोलिसांच्या हाती लागला आहे. कन्नड येथील त्याच्या घराला घेराव घालत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. राज्यतील शेतकऱ्यांना ३० टक्के व्याजासह पैसे परत देण्याच्या नावाखाली याने हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी एका तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी संतोष राठोड याला कन्नड येथील घरातून अटक केली.
काय आहे ३०-३० घोटाळा ?
औरंगाबाद शहरातील DMIC प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. सरकारने याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला. आता शेतकऱ्यांकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसा आहे, ही बाब लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने शेतकऱ्यांसाठी गुंतवणुकीची एक योजना आणली. दर महिन्याला ३० टक्के परतावा मिळवून देतो, असे सांगण्यात आले.
सुरुवातीला संतोषने शेतकऱ्यांना परतावा केला, त्यामुळे योजनेची व्याप्ती हळू हळू बिडकीन, पैठण, औरंगाबाद जिल्ह्याततील इतर तालुक्यांसह महाराष्ट्रात वाढत गेली. मात्र मागील एका वर्षापासून शेतकऱ्यांना व्याज नाही आणि शेतकऱ्यांनी गुंतवणूक केलेली मुद्दलही परत मिळाली नाही.