क्राईम बिट

सैफवर हल्ला नेमकं काय घडलं? नर्सचा धक्कादायक खुलासा

Share Now

सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात गुरुवारी (१६ जानेवारी) मध्यरात्री एका चोरट्याने शिरकाव केला. तो थेट त्यांच्या धाकट्या मुलगा जेहच्या खोलीपर्यंत पोहोचला. यावेळी, घरातील मदतनीसाने त्याला पाहिले आणि जेहला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने तिच्यावर हल्ला चढवला.

घटनेचा आवाज ऐकून सैफ आणि करीना तिथे आले. त्यानंतर चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत, मदतनीस एलियामा फिलिप (वय ५६) यांनी सर्वप्रथम चोरट्याला पाहिल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांना सविस्तर माहिती दिली आहे. चला, आता जाणून घेऊया, त्यांनी नेमके काय सांगितले.

१५ जानेवारी रात्री ११ वाजता, मी सैफ अली खान यांचा धाकटा मुलगा, जहांगीर उर्फ ​​जयबाबा (वय ४), याला जेवण भरवले आणि झोपवले. त्यानंतर मी आणि माझी सहकारी जेहजवळ रात्रभर थांबलो. साधारण मध्यरात्री २ वाजता अचानक आलेल्या आवाजाने माझी झोप मोडली. बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि लाईट चालू होते. मला वाटले करीना मॅडम जेहला पाहायला आल्या असतील, त्यामुळे पुन्हा झोपायचा प्रयत्न केला, पण मन अस्वस्थ होत असल्याने उठून बाथरूमकडे पाहिले. तेव्हा, एक अनोळखी व्यक्ती बाथरूममधून बाहेर येऊन जेहच्या पलंगाकडे जाताना दिसला.

घाबरून मी झटकन जेहच्या जवळ गेले. त्या व्यक्तीने हातवारे करून मला आवाज न करण्याचा इशारा केला. त्याचवेळी जेहची नॅनी, जुनू, जागी झाली. त्या हल्लेखोराने तिच्याही दिशेने शांत राहण्याचा इशारा केला. त्याच्या एका हातात काठी होती, तर दुसऱ्या हातात धारदार ब्लेडसारखी वस्तू. जेहला वाचवण्याचा प्रयत्न करताच त्याने ब्लेडने माझ्यावर हल्ला केला, ज्यामुळे माझ्या दोन्ही हातांना जखमा झाल्या. मी त्याला विचारले, “तुला काय हवे आहे? पैसे हवेत का?”. तो म्हणाला, “मला एक कोटी रुपये पाहिजेत.”

या गोंधळामुळे करीना मॅडम तिथे धावत आल्या. सैफ सरांनी त्या व्यक्तीला विचारले, “तू कोण आहेस? तुला काय हवेय?” त्याने त्यांच्यावर काठी आणि धारदार ब्लेडने हल्ला केला.

गीता नावाच्या दुसऱ्या नर्सलाही त्याने लक्ष्य केले. परिस्थिती गंभीर झाल्याने आम्ही खोलीतून बाहेर पळालो आणि वरच्या मजल्यावर जाऊन दरवाजा लॉक केला. आमच्या आरडाओरडीनंतर घरातील इतर कर्मचारी खाली आले. मात्र, खोलीत परतल्यावर आम्हाला तो हल्लेखोर सापडला नाही.

या हल्ल्यात सैफ अली खान यांच्या मानेला, उजव्या खांद्याला, पाठीला, डाव्या मनगटाला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्राव झाला. गीतालाही मनगट, पाठ आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या.

हल्लेखोर साधारण ३५-४० वर्षांचा, सावळ्या रंगाचा आणि सडपातळ बांध्याचा होता. त्याची उंची ५ फूट ५ इंच असून, त्याने गडद रंगाचे कपडे आणि टोपी घातली होती, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सध्या सैफ अली खान लीलावती रुग्णालयात दाखल असून, मणक्याच्या गंभीर जखमेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *