साहित्य संमेलनाचं सूप वाजलं चिंता वर्चस्वाची आणि अस्तित्वाची !
दरवर्षीप्रमाणे यंदाही वाद विवादाचे पडसाद उमटवत संमेलन पार पडलं, मला वाटतं की साहित्य महामंडळ जणू वादासाठीच संमेलनाची वाट बघत असते. मराठीच्या चिंतेपेक्षा त्यांच्या अस्तित्वाची आणि वर्चस्वाची चिंता जरा अधिकच असावी. अनेक सो कॉल्ड साहित्यिक तर संमेलनाला दरवर्षी नाव ठेवण्यात धन्यता मानतात.. त्यांचा सहभाग नसला की ते संमेलन किती निरस आणि विस्कळीत अशी हाळी देत रकाने लिहून आपले मराठीप्रती असलेले कर्तव्य पार पाडतात. एरवी साहित्यातील तपस्वी भासवणारी ही मंडळी क्रोध व्यक्त करत आता तपाने सगळं भस्म करतील का ही भीती वाटते, पण त्यांचं बोंबलण्याचं ईप्सित साध्य झालं की पुन्हा भस्म फासून मौनात जातात. ‘मी शिकवण्यासाठीच’ या भूतलावर अवतरलो हे पटवण्याचा त्यांचा अट्टाहास बघितला की कीव येऊ लागते.
उदघाटनाला जावेद अख्तर येऊन गेले. मराठीत कुणी सापडले नाही का इथपासून ते जावेद डावा आहे, चित्रपट लेखक -गीतकार आहे त्याचं काय एवढं इथपर्यंत वांझोट्या वादाच्या ठिणग्या. जावेद अख्तर उदघाटनाला येऊन गेले याचे दु:ख आहे की खंत, की मराठीची काळजी ? विरोध हा नेमका जावेद यांना होता की, निमंत्रकांना होता? की जावेद यांच्या राजकीय भूमिकेला ? साहित्य अकादमी मिळालेले कवी-लेखक आहेत. ते केवळ सिनेमा लिहून मिळत नसावे असे मला वाटते. असो,
मराठीचा झेंडा घेऊन चालताना आपण अन्य भाषांकडे बघणार आहोत की नाही? सतत सृजनशील असणाऱ्या भाषांचा कानोसा घेणार आहोत की नाही? याचा विचार साहित्यिक आणि विचारवंतांनी करावा अशी अपेक्षा आहे. महामंडळाची- पदाधिकारी, काही साहित्यिकांची तऱ्हा मात्र वेगळीच असते. एकीकडे राजकीय मंडळींसोबत कानगोष्टी आणि दुसरीकडे त्यांनाच दूषण. दरवर्षीं संमेलनासाठी राजाश्रय घ्यावा की घेऊ नये यावर चर्चा झडतात, याचा सोक्षमोक्ष लावण्याची ताकद कुणातच नाही.
हिंडता फिरता अध्यक्ष असावा असं सांगणारे निवड प्रक्रियेत नसतात असं कोण म्हणेल? तुम्ही आधी दुर्लक्ष केल्यानेच त्यांना अशा वयात बोलवावं लागतंय. वर्षानुवर्षे खुर्च्या उबवत पदांचा येथेच्छ उपभोग घेणारे असताना त्यांना अशा अडचणींची माहिती नसते का ? केवळ लक्ष वेध यासाठी अनेक काड्या असतात त्यापैकीच ही एक होती अशी शंका आहे.. खरे तर साहित्य परिषदा आणि साहित्य मंडळे यांनी दरवर्षी भाषेला आपण किती पाऊलं पुढे नेलं हे सांगितलं पाहिजे. मंडळांवर ताशेरे ओढत डिंग्या मारणाऱ्या साहित्यिकांनी त्यांच्या निवडणुकीत सहभाग नोंदवत बदल घडवले पाहिजे. पण हे होत नाहीत. तिथे शेपूट घालत नंतर बाहेर ओरडा करतात. पदं आणि साहित्य विषयक पुरस्कार मिळू शकतो हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष वेळ आल्यावर विरोध न करता एक तर ‘मम’ म्हणतात किंवा मौनाचा आश्रय घेत चिडीचूप होऊन जातात. निवडणूक प्रक्रिया आणि राजकारण बघितले तर यांनी राजकारण्यांना नाव ठेवण्यापेक्षा साहित्य परिषदा आणि मंडळांचे राजकारण यावर आक्षेप घेत ते बंद करण्याचे धाडस केले पाहिजे. पण हे होणे नाही.
नाशिकमध्ये संमेलन झाल्याने एक महत्वाचा विषय . स्वा. सावरकर यांचा यथोचित सन्मान अपेक्षित होता तो झाला नाही, एका व्यासपीठाला त्यांचे नाव मात्र दिले होते, जिथे काव्य वाचन रंगले. सावरकर यांची विचारसरणी, त्यांचे हिंदुत्त्व आणि त्यासंदर्भाने अधूनमधून होणारे वाद, स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका, याही पलीकडे जाऊन सावरकर यांचे साहित्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या गौरवाची संधी साधली जाणे गरजेचे होते. जातीत अडकवून काही व्यक्तिमत्त्वे -त्यांचे कार्य संपवले गेले त्यापैकी सावरकर एक आहेत असे वाटते. १९२४ मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. , परभाषेबद्दल द्वेष नको फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. याची किमान दखल अपेक्षित होती.
भाजपा नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी यांनी संमेलन टाळायला नको होते, जिथे सावरकर नाहीत तिथे जाणार नाही असे म्हणत बहिष्काराची भाषा करण्यापेक्षा मिळालेल्या निमंत्रणाचा अचूक वापर करत सावरकर आणि त्यांच्या योगदानावर दणदणीत भाषण करून यायला हवे होते. पण महाराष्ट्र भाजपच्या सध्याच्या मानसिकतेवर बोलणंच नको. एकूण संमेलनातून दिसणारे वाद यंदाही दिसले आणि डावललेल्यांचा गलबला यंदाही होता याचा अर्थ संमेलन यशस्वी झाले !
जाता जाता : अभिजात दर्जासाठी मराठीजन सरसावून बोलू लागतात, शासन दरबारी हालचाली होतात.. याची प्रचिती यंदाही होती. यावेळी हिंदीतील काही ज्येष्ठ, व्यासंगी अभ्यासक आणि लेखक यांच्याशी संवादाचा योग आला तेव्हा त्यांनी व्यक्त केलेल्या मतांमधील एक मुद्दा मला सांगावा वाटतो, एखादी भाषा किती प्राचीन आहे, इतिहास किती देदीप्यमान आहे याच्यासोबत भाषेतील समकालीन समृद्धी , समकालीन साहित्य कितपत दर्जेदार आहे, अन्य भाषेतील दर्जेदार अथवा अभ्यासपूर्ण साहित्य आपल्या भाषेत. किती अनुवादित झाले आहे आणि भाषा शिक्षणाचे प्रमाण किती आहे यावरही बरेच काही अवलंबून आहे.
– सारंग टाकळकर