नात्यांमध्ये पारदर्शकता महत्त्वाची चांगलं जगण्याचा मूलमंत्र – मेघा देशमुख
आज अनेक सामाजिक कार्यकर्ते आपण बघतो, पण त्याच काम कमी आणि गाजावाजा मात्र गावभर असतो, घरात सर्वकाही असताना देखील आपण माणूस म्हणून समाजाला काही तरी देणं लागतो, अशी वृत्ती मनाशी बाळगून सक्रिय सामाजिक कार्य करणाऱ्या पेशाने वकील असल्या तरी मनाने हळव्या अश्या ऍडव्होकेट मेघा राजेंद्र देशमुख यांची मुलाखत.
तुमची आई स्वातंत्र्य सेनानी, त्यांचा वारसा तुम्ही समाजासाठी वापरात आहात, इथवरचा प्रवास कसा झाला ?
– मी स्वतःला भाग्यवान समजते की माझी आई सिंधुताई भालेराव यांच्या पोटी माझा जन्म झाला. आई माझी सक्रिय स्वातंत्र्य सेनानी, कवियत्री, लेखिका लोकसंगीत आणि लोक संगीताचे अनेक प्रकार यावर आईने भरपूर लिहले आहे . समाजाचे ऋण माना अशी भावना आईने आमच्यामध्ये रुजवली, त्याच बरोबर आईने खूप चांगलं शिक्षण आम्हाला दिलं. याचा मला कायम अभिमान आहे . या आईची कन्या म्हणून मी आईच व्रत मी पुढे चालू ठेवणार आहे. आमची आई प्रभात फेऱ्या काढायच्या त्यानंतर तुरूंगात भाकरीच्या टोपलीमध्ये संदेश चिठ्ठ्या द्वारे पोहचवण्याचं काम करायच्या . त्यावेळी माझी आई आकाशवाणीवर निवेदिका सुद्धा होती. अहिल्याबाई होळकर हा मनाचा पुरस्कार देखील आईला मिळाला आहे . अशा संस्कारात आम्ही वाढलो आहोत यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी माझ्या आईमध्ये देवीचं रुप पाहिलं आहे, आई माझ्यासाठी सरस्वती आहे.
तुम्ही बऱ्याच ठिकाणी समुपदेशन देण्यासाठी जाता किंवा महिला- मुलीवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध लढताना तुम्ही वकील म्हणून त्यांच्या कडून कसलीही फी घेत नाही.!
मी विशाखा मंडळ व महिला मेळाव्यात समुपदेशन करते. काही पालक मुली येतात समुपदेशनासाठी त्यांच्याकडून मला कसल्याही पैशाची अपेक्षा नसते त्याव्यतिरिक्त मी त्यांचं नावही गुप्त ठेवते . पण कुणाची स्वतःहून देण्याची इच्छा असेल तर मी त्यांना पुस्तक स्वरूपात देण्याचं आवाहन करते. ते पुस्तक मी शाळा आणि महाविद्यालयात देत असते त्याच बरोबर माझ्या घरातील ग्रंथालयात जवळपास अडीच हजार पुस्तक आहेत.
अगदी लहान मुली पासून जेष्ठ महिलेवर अत्याचार होतात, अशा महिला व मुलींसाठी देखील तुम्ही काम करीत आहात या वाईट वृत्तीला सामोरे जाताना आपली मनस्थिती कशी सांभाळायची ?
– याची सुरवात आपण आपल्या घरातून करायला हवी, जेव्हा आपल्या मुलीची मैत्रीण चुकीचं वागत असेल तर तिची योग्य समजूत आपणच काढायला हवी . प्रत्येक आई वडिलांचे संस्कार चांगलेच असतात पण बाहेरच वातावरण तुम्हाला थोडं वाईट प्रवृत्तीकडे झुकायला भाग पाडत. त्यामुळे त्या मुलाला सकारात्मक बाजूने समजावून सांगितले नाही तर तुमच्या वाट्याला निराशा येत नाही. समाजात मदत करताना उपकाराची भावना नसावी, किंवा तुमच्यावर असलेली वेळ निघून जाईल अशी भावना आम्ही बाळगून मदत करीत असतो.
मेघा तुम्हाला वकील म्हणून महिलांसाठी मदत करत असाल त्याबद्दल काही.?
– मी अचानक वकिली शिक्षणाकडे वळले, बीए ला असताना असं ठरलं होतं की, प्रशासनात काम करायचं आणि जनतेची सेवा करायची. त्याचबरोबर आकाशवाणी मध्ये मी Casual Artist म्हणून सतरा वर्ष काम केलं आहे. पण कायदा मला माहित असेल तर मला महिलांसाठी मदत करायला जास्त मदत होईल. म्हणून मी कायद्याचं शिक्षण घेतलं. महिलांना माझी विनंती आहे महिलांनी अन्यायाविरुद्ध लढताना कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
कुटुंब व्यवस्था डळमळीत झाल्याच आपण बघत आहोत, त्यावर समाजाचा घटक म्हणून काय करायला हवं, यावर तुम्ही काय सांगाल.?
– हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था खुप अवघड झाली आहे. परस्परामध्ये संवाद कमी पडत आहे, जेव्हा माझ्याकडे काही मुलं मुली येतात याना अगोदर मी आई वडिलांना तुमच्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगा कारण तुमच्या सगळ्यात जवळचे आई वडिल आहेत. कोरोनाच्या काळात कौंटूंबिक वादात वाढ झाली आहे, यासाठी नात्यामध्ये संवाद आणि पारदर्शकता महत्त्वाची आहे.