रामदास कदमांचा आपल्याच सरकारवर निशाणा
खेडच्या नगराध्यक्षांना निलंबित करण्याची मागणी
शिवसेना आमदार रामदासभाई कदम याना पक्षतून डावलले जात आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी देखील व्यक्त केली. अनिल परब आणि उदय सामंत याच्यावर थेट आरोप रामदास भाई कदम यांनी केले, यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेले आहेतच त्यातच आज कदमांनी आपल्याच सरकारला जाब विचारत धक्का दिला.
रामदासभाई कदम यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर विधानपरिषदेत हल्लाबोल केला. मनसेचे नेते आणि खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना ताबडतोब निलंबित करा. नाही तर कोर्टात जाईल, असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे. रामदास कदम यांनी आपल्याच सरकारवर टीका केल्याने अनेक जण चकित झाले.
रामदास कदम यांनी आज विधान परिषदेत खेड नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावरून थेट महाविकस सरकारवर आरोप केला. नगराध्यक्षाने नगरपालिकेत अनेक भ्रष्टाचार केले. २० प्रस्ताव केले. त्यांना अपात्र करण्यासाठी ५० टक्के नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. २० पैकी ११ मुद्द्यात ते अपात्र होऊ शकतात, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. नियमाप्रमाणे नगरविकास खात्याने १५ दिवसात त्यांना अपात्र केलं पाहिजे. पण दोन महिने झाले प्रस्ताव राखून ठेवला. त्यांना अपात्र केलं जात नाही. ११ मुद्द्यावर भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं आहे. त्यांना पाठिशी का घालता ? ते तुमचे जावई आहेत का ? असा प्रश्न रामदासभाई कदम यांनी केला आहे.