राजकीय नेत्यांना कोरोना आता एकनाथ शिंदे पॉझिटिव्ह !
जनतेला काळजी घेण्याचे डोस पाजत इशारे देणारे राजकीय नेते किती गंभीर आहेत हे सांगणाऱ्या बातम्या सध्या सगळीकडे दिसत आहेत. एककीकडे सरकारने जनतेला इशारे द्यायचे आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम सुरु ठेवायचे हा प्रकार सर्रास सुरु आहे. एकापाठोपाठ एक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येत आहेत. देशभरात हीच स्थिती आहे.
इकडे महाराष्ट्रात पंजा मुंडे, सुप्रिया सुळे यांच्या नंतर आता अनेकांचे ट्विट सुरु झाले आहेत. यामध्ये आता शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन त्यांना करोना झाल्याची माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार , खासदार अरविंद सावंत आणि मुंबईतील भाजप नेते अतुल भातखळकर यांनाही सोमवारी करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली होती. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल +ve आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असे भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2022