पुण्याची पुनरावृत्ती औरंगाबाद मनसेतही होणार ?
राज ठाकरे ‘नव्या कृष्णकुंज’ वरून आता बाहेर पडून राज्याचा दौरा करत आहेत. नाशिकनंतर ते औरंगाबादला येऊन गेले. नाशिकमधील त्यांची वक्तव्ये, अनेक प्रश्नांवर भाष्य आणि काही बिटवीन द लाईन्स! हा नेता केवळ मीडियासमोर आला तरी धमाका उडवून देतो… हेच बलस्थान आहे. करिष्मा असलेले राज पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याने अनेक तर्क सुरु झाले आहेत. आगामी निवडणुका आणि भाजपसोबत संभाव्य युतीची चर्चा स्वाभाविक होती.
औरंगाबादला मात्र राज यांनी आपल्याच संघटनेतील काहींना धक्का दिला. नव्याने पत्ते पिसून सिक्वेन्स लावण्याचा प्रयत्न केला, इथल्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा डाव टाकला गेला. दोन वर्षांपूर्वी सेनेतून आलेल्या दाशरथे यांनी जिल्हाध्यक्ष पद मिळवत वाटचाल सुरु केली आणि जुनेजाणते बाजूला सरकवले गेले. दशरथे यांनी मग पद हाती आल्यावर सेनेच्या शैलीत काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण म्हणावा तसा बेस लाभला नाही. राज यांच्या परवाच्या दौऱ्यात त्यांनी अचानक जिल्हाध्यक्ष पदी असलेल्या दाशरथे यांना बाजूला केले. हा धक्कादायक निर्णय होता. “जनतेचे प्रश्न मांडले, शासनाला जाब विचारला पण मला राजसाहेबांनी भेटही दिली नाही. अशी खंत व्यक्त करून सुहास दाशरथे यांनी राज यांना विनंतीवजा प्रश्न केलाय, ‘साहेब माझं काय चुकलं हे सांगा?
ती आंदोलने दिखावा होता, अनेक गोष्टी मॅनेज असतात. बैठक आणि बांधणीत दाशरथे कमी पडले का ? अशा अनेक चर्चा मनसे वर्तुळात आहे. औरंगाबाद मनपा निवडणूक पार्श्वभुमीवर दशरथे यांची नाराजी आणि त्यांचा रोख या पक्षासाठी महत्त्वाचा. आपल्यासाठी स्वाभिमान आणि निष्ठा हेच महत्त्वाचे असल्याचे दाशरथे सांगतात. त्यांच्या सोबतची टीम काय पवित्रा घेते आणि सुहास हे कोणत्या दिशेने वाटचाल करतात. पुण्यात रुपाली पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत आजच प्रवेश केलाय. राज ठाकरे पुण्यात येण्यापूर्वीच त्यांनी नवा पक्ष प्रवेश केला.
दशरथे यांना डावलले जाणे आणि मनसेत झालेले फेरबदल या मागे दाशरथे यांची जशी बाजू आहे तशी मनसे वरिष्ठांची एक भूमिका असणार, आहे. राज ठाकरे यांनी शहरातील अनेकांची भेट या दौऱ्यात घेतली. कदाचित या निर्णयाला पुष्टी देणारे काही संकेत या भेटींमधून मिळाले किंवा फिडींग प्रमाणे निर्णय झाला असेल. पूर्वीचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर पुन्हा या पदावर आले, मात्र यावेळी शिवसेना पद्धतीप्रमाणे जिल्हाध्यक्ष पद विभागून इथे तीन केले गेले आणि महानगरप्रमुख पदही निर्माण केले गेले. मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेने आपले पत्ते पिसले , जुनी जाणती सेनाही पत्ते पिसणार की पत्ते इतक्यात उघडणार नाही, भाजपा कोणत्या चालीने सेनेवर मात करणार आणि राष्ट्रवादी-काँग्रेस, एमआयएम आपापले डाव मांडण्यास कधी सुरुवात करणार हे आता कळायला लागेल.