क्राईम बिट

माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची पुणे बलात्कार घटनेवर मोठी प्रतिक्रिया

Share Now

भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीही यावर भाष्य करताना प्रभावी कायद्यांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी नमूद केले की, निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदेशीर सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी केवळ कायद्यानेच अशा घटनांना आळा बसू शकत नाही. समाजानेही महिलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक जबाबदारी घेतली पाहिजे.

चंद्रचूड पुढे म्हणाले की, “महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अशा गुन्ह्यांच्या तपासात विलंब न होता कठोर कारवाई व जलद न्याय सुनिश्चित करणे गरजेचे आहे. पोलिस आणि न्यायसंस्था यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. महिलांनी निर्भयपणे शिक्षण आणि नोकरीसाठी प्रवास करता यावा, यासाठी समाजानेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.”

दरम्यान, आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल होते. सध्या तो जामिनावर होता. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू केली असून जलदगतीने तपास केला जात आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे स्वारगेट बसस्थानकावर तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पडीक शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. मंगळवारी पहाटे घडलेल्या या प्रकारानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, अखेर पुणे पोलिसांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनच्या मदतीनेही शोध घेतला गेला. अखेर पोलिसांनी आरोपीला त्याच्या गावाजवळील एका कॅनॉलच्या खड्ड्यात लपून बसलेला अवस्थेत शोधून काढले.

या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले, “घटनेनंतर आम्ही तत्काळ तपास सुरू केला. स्वारगेट एसटी स्थानकातील २३ तसेच परिसरातील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आरोपीची ओळख पटली होती. मात्र, तो फरार झाला होता. अखेर दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर आम्ही त्याला पकडण्यात यशस्वी ठरलो.”

पोलिसांच्या या मोहिमेत स्थानिक नागरिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या नागरिकांचे आभार मानले असून लवकरच गुणाट गावाला भेट देऊन त्यांचा सत्कार करणार असल्याचे जाहीर केले आहे. या शोध मोहिमेत सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *