पेट्रोल दरवाढ | दोन आठवड्यापासून सातत्याने वाढ, पेट्रोल १५० रुपयावर जाणार?
सध्या देशभरात महागाईने कळस गाठला आहे. इंधन दरांची मोठी वाढ आपल्याला गेल्या २-३ महिन्यात पासून पाहायला मिळत आहे. यावर राजकीय वादंग सुद्धा पेटतांना आपल्याला दिसत आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमा लगतच्या राज्यात जाऊन नागरिक पेट्रोल डिझेल भरताना दिसत आहे. आज मुंबई पेट्रोल तब्बल ११९.६७ तर आणि डिझेल १०३.८२ रुपय प्रति लिटरवर पोहोचले आहे.
दरम्यान, तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ८० पैशांनी वाढ केली. दोन आठवड्यात १३ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. गेल्या २४ मार्च आणि १ एप्रिल असे दोनच दिवस तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये आतापर्यंत दोन आठवड्यात पेट्रोल ९.२० रुपयांनी महागले आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर आता १०४.६१ रुपये प्रतिलिटर झाला आहे, तर डिझेलचा दर ९५.८७ रुपये झाला आहे.
कोलकातामध्ये पेट्रोलचे दर आता प्रतिलिटर ११४.८४ रुपये, तर डिझेलचे दर ९९.०२ रुपये प्रति लिटरवरून वाढले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ११९.६७ रुपये आणि डिझेलचा दर १०३.९२ रुपये प्रतिलिटर झाला आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ११० रुपये, तर डिझेलचा दर १००.१० रुपये प्रति लिटर झाला आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.